blog-3

… आधि केलेचि पाहिजे!

7 years ago / Recovery Strength / 0 Comments

मी हात-पाय का हलवावेत? पडू दे ना कामांचा ढिगारा आहे तस्साच. माझ्यावर का सक्ती तो हटविण्याची?
हा विचार काही मला नवा नाही. खरं तर हा विचार नाहीच, संभ्रम आहे.
कुणी कुणावर कशाचीही सक्ती करणं नक्कीच चुकीचं आहे. कारण, ते अंतिमत: निरूपयोगी आणि घातकही आहे.
पण सक्ती कोण करतो? जो ‘हतबल’ म्हणजेच ‘बलहीन’ असतो तो. बलवान मनुष्य किंवा प्राणी किंवा परिस्थिती इतरांवर सक्ती करत नाहीत तर इतरांना अशी परिस्थिती आणि भावना निर्माण करतात की त्यांनी बलवानाला अपेक्षित कृती स्वत:हून करावी. हे बल प्रेमाचे असू शकते, आदर-विश्वास-श्रद्धेचे असू शकते तसेच दहशतीचेही असू शकते; हे खरे आहे. पण दहशत (आणि प्रेम, विश्वास वगैरेसुद्धा) असते कुठे? बलवानाच्या हातांत नव्हे तर बलहीनाच्या मनात! जशी तान्ह्या बाळाला नागाची कसली दहशत असणार? (आणि गाढवाला गुळाची चव ती काय असणार?) तेव्हा, सक्ती बलवान करीत नाहीत, करूच शकत नाहीत हे खरे!
आपण जेव्हा स्वत:वर सक्ती करण्याचा विचार करतो तेव्हा आपण स्वत:पुढे असे बलहीनच झालेले असतो खरे तर. ही हतबलता दूर केली तर सक्तीच्या जागी उरेल ते असेल आवाहन. निमंत्रण. हातपाय हलविण्याची आणि कामाचा डोंगर उरकण्याची सक्ती नव्हे तर निमंत्रण! जे आपण स्वीकारण्याची शक्यता बळजबरीपेक्षा नक्कीच जास्त असते!

डाॅ. अनिमिष चव्हाण

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *