blog-3

भयाहूनही भयंकर

7 years ago / Stigma Discrimination / 0 Comments

साधारण पन्नाशीची ती स्त्री. वेशभूषा आणि आभूषणं यावरून तिची सामाजिक पार्श्वभूमी निम्नस्तरीय  असावी हे कुणालाही सहज समजावं अशी एकंदर स्थिती. तिला तिची मुलगी दवाखान्यात घेऊन आलेली. मुलीचं शिक्षण, बोलणं आणि एकंदर व्यक्तिमत्व मात्र आईपेक्षा बरंच पुढारलेलं जाणवत होतं. मात्र, आईविषयी करूणा लपत नव्हती.
आईला भास होतायत, बोलणं विसंगत आहे म्हणून तिला तपासणीसाठी आणलेलं.

तिच्याशी आमच्या मानसोपचारतज्ज्ञ संवाद करीत असताना ती स्त्री आपली जीवनकहानी सांगत होती. भंगार गोळा करण्याचा व्यवसाय एकटीच्या हिमतीवर उभारून तिनं आयुष्य पेललेलं. मुलीला शिक्षण दिलेलं. कित्येक संकटं परतवून लावलेली. या जगण्याच्या लढाईत सतत भयाचा सामना करावा लागला असेल ना? या प्रश्नावर तिचं भाष्य होतं : ‘भिऊ कशाला? भिणं म्हणजे मरणं! मला जगायचं आहे, माझा संसार चालवायचा आहे. भिऊन जमायचं नाही. येईल त्या संकटाशी चार हात केल्याखेरीज माझं पोट भरायचं नाही.’ मनातल्या भयावर मात करायला जगण्यानंच असं शिकवलेलं! मानसोपचारतज्ज्ञ तिला म्हणाल्या, ‘तुमचं हे म्हणणं अगदी पटलं बरं!’ त्यावर अगदी अनपेक्षितपणे तिच्या डोळ्यांत अविश्वासाचे ढग दाटून आले! म्हणाली, ‘तुम्हाला माझं म्हणणं पटलं? एका खालच्या जातीच्या बाईचं म्हणणं पटलं?!’

जगण्याच्या लढाईत भयाहूनही भयंकर काय सोसलं असेल तिनं हे समजण्यासाठी तिचा हा प्रश्न पुरेसा होता!
डाॅ. अनिमिष चव्हाण

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *