
भय इथले…
9 years ago / Strength Wellness / 0 Comments
दररोजचं वर्तमानपत्र उघडावं तर कुठे तरी पडलेला रक्त-मांसाचा चिखल पहावा लागतो. कुठेकुठे कुणीकुणी केलेल्या घोर फसवणूक किंवा अत्याचाराच्या घटनांना तर वर्तमानपत्रांची पानंही पुरत नाहीत. ग्लोबल वार्मिंग, युद्धं, दहशतवाद, दुष्काळ, रोगांच्या साथी, अपघात, हरवती माणूसकी अशा अनेकानेक गोष्टींचे भयकारी प्रत्यय अनेकजण अनेकवेळा आपल्याला पुरवत असतात. अशा परिस्थितीत आपण एक थिजलेलं पाखरू बनून या जगाच्या कोपर् यात सतत एखादा सुरक्षित कोनाडा हुडकत रहावं नाही तर काय?
पण, हा सुरक्षित कोनाडा आहे कुठे? आपण जर अंतर्बाह्य भयकंपीत असू तर कुठल्याही बंकरमध्ये आपल्याला असा दिलासा मिळणं अशक्यच आहे.
अशावेळी आईच्या पदराआड निर्धास्त बागडणारं बालक आपल्या मनात असूया निर्माण करतं. जंगलात फुललेलं नाजूक फुल आश्चर्याचा विषय बनतं. त्यांचं या जगाविषयी अनभिज्ञ असणं, ‘अज्ञानी’ असणं हे त्यांच्या आनंदाचं ‘कारण’ आहे का?
हो, तथाकथित ‘ज्ञाना’पासून ही मुलं आणि फुलं दूरच आहेत. कल्पनेतले रंग भरून आपलं आकाश त्यांनी कलूषित केलेलं नाही. जे वास्तव समोर येईल त्याच्याकडे उत्सुकतेनी पाहण्याचं कुतुहल त्यांनी अजूनही सोडलेलं नाही.
हो, या सृष्टीच्या अंगणात खेळ मांडण्याचं ‘बाल्य’ त्यांनी त्याजलेलं नाही. दोरी-काटकी घेऊन त्यांत दंग होण्याचा छंद त्यांनी सोडलेला नाही.
त्यांचं जगण्यावर प्रेम आहे आणि जगण्याचा ध्यासही त्यांना आहे. चालताना मृत्यूचे सापळे चुकवण्याऐवजी जीवनाचे तुषार झेलण्याचं त्यांना वेड आहे.
वेडीच आहेत ती मुलं आणि फुलं! त्यांनी आपल्या मनात सुखाचा आसरा शोधला आहे!
डाॅ. अनिमिष चव्हाण.
by Admin
0 Comments
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *