blog-3

मनो-सामाजिक पुनर्वसन उपचार

4 years ago / Rehabilitation Psychotherapy / 0 Comments

अशी कल्पना करा की, एक दिवस तुम्ही सकाळी झोपेतून जागे झाले आहात आणि … …….तुम्हाला कोणत्याच गोष्टीत रस वाटेनासा झालाय. अगदी बिछान्यातून उठून ब्रश करणेही महा-मुश्कील वाटतंय… डोक्यात नकारत्मक विचारांचा गोंधळ उडालाय… आयुष्य अगदी अर्थहीन वाटायला लागलाय…

किंवा तुम्हाला कानात चित्र-विचित्र आवाज ऐकू येताहेत… थोडे भीतीदायक, थोडे गोंधळात टाकणारे… डोळ्यांसमोर विचित्र अकुत्या, चेहरे दिसायला लागलेत… आपल्या डोक्यात चालू असलेले सगळे विचार रेडीओ, टी.व्ही., फेसबुक, व्हॉटस्-अप सारख्या माध्यमांतून आपोआप लोकांपर्यंत पोहचले जाताहेत…

…….तुम्ही खूप उत्साहाने, आज गुणवत्तापूर्ण काम करायच अशा तयारीने ऑफिसला गेलात पण… दिलेल्या कामात तुमच लक्षच एकाग्र होत नाहीये… विचार तुटक, अस्पष्ट आणि विस्कळित होताहेत… तुमच्या बॉसने कामासंदर्भात दिलेल्या साध्या – साध्या सूचनाही तुमच्या लक्षात राहत नाहीयेत…. याचा परिणाम म्हणून तुमचे काम अपूर्ण राहिले आहे आणि त्यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर नाराज आहेत…. तुमचा आत्मविश्वास कमी होत चाललाय….

किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक कॅसेट फास्टफॉरवर्ड मोडमध्ये चालवल्याप्रमाणे वेगात बोलत आहेत….. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय हव आहे हे तुम्हांला त्यामुळे नीट समजत नाहीये …. ते समजून घेताना खूप ताण येतोय….

… अशीच काहीशी अवस्था होत असते, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींची. मानसिक आजार आणि त्यासाठी उपलब्ध असलेले उपचार या बाबत एकूणच समाजात खूप प्रमाणात अज्ञान व गैरसमज आहेत… पुनर्वसन उपचार हे असेच, खूप कमी प्रमाणात उपलब्ध आणि ज्ञात असलेले उपचार आहेत.

ओषधोपचार आणि मानसोपाचारांबरोबर पुनर्वसन उपचार घेणे अनेक अर्थाने फायद्याचे आणि गरजेचे असते. मानसिक आजारामुळे निर्माण झालेल्या भावनिक, बोधनात्मक व सामाजिक समस्या निव्वळ ओषधांच्या साह्याने पूर्णपणे ब-या होऊ शकत नाहीत. हि गोष्ट पुनर्वसन उपचारांच्या मदतीने साध्य केली जाऊ शकते. पुनर्वसन उपचार प्रामुख्याने चार पातळ्यांवर केले जातात.

बोधनात्मक पुनर्वसन उपचार

    आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने मिळालेली माहिती ग्रहण करणे, त्यांचा अर्थ लावणे, साठवून  ठेवणे व साठवलेली माहिती गरजेनुसार वापरणे याला बोधनात्मक कौशल्य म्हणता येईल. काही प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये अशा बोधनात्मक समस्या र्निमाण होतात. यामध्ये आजारी व्यक्तींची, माहितीचे ग्रहण व अनुमान प्रक्रिया धीमी होते. याचा परिणाम, ग्रस्त व्यक्तींच्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदा-या, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, नातेसंबंध अशा आयुष्यातील जवळ जवळ सर्वच अंगावर होतो. बोधानात्मक समस्या असणे म्हणजे बुद्धिमत्ता कमी होणे असे नाही. माझी एक इंजिनिअरींग शिकणारी रुग्ण उपचारादरम्याण मला म्हणाली की तिच्या बहिणीने टी.व्ही. लावला की तिला खूप राग येतो. यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर असे लक्ष्यात आले की टी.व्ही. वर नवीन मालिका सुरु होते तेव्हा त्या मालिकेतील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत? त्यांना त्या प्रसंगात नेमके काय म्हणायचे आहे? हे समजावून घेताना तिला खूप ताण येतो व त्यामुळे चिडचिड होते.

वर सांगितल्याप्रमाणे माहितीचे ग्रहण व अनुमान प्रक्रीया धीमी झाल्यामुळे तिला हा त्रास जाणवत होता. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सर्वसामान्य लोकांना सहज, क्षुल्लक वाटणा-या गोष्टी मानसिक आजारी व्यक्तींसाठी किती अवघड व त्रासदायक होत असतील.  पुनर्वसन उपचारांमध्ये आजारी व्यक्तींच्या बोधानात्मक क्षमता सुधारण्यासाठी त्यांना मेंदूचे काही खास व्यायाम शिकवले जातात. ज्या क्षमता पूर्णपणे सुधारणे शक्य नाही तिथे पर्यायी समायोजन (Compensatory, adaptive ) तंत्रे शिकवली जातात. अर्थात प्रकिया खूपच संयतपणे होणे गरजेचे असते. यासाठी उपचारकर्त्यांबरोबरच रुगाच्या कुटुंबियांच्या साय्यामाचाही कस लागतो.

भावनिक पुनर्वसन उपचार

दुसरी पातळी म्हणजे भावनिक पुनर्वसन उपचार. मानसिक आजाराच्या अनुभवाने रुग्ण स्वत: खूप घाबरलेले, गोधळलेले असतात. शिवाय बोधनात्मक समस्यांमुळे त्यांना आपले मत, विचार, त्रास इतरांना सांगणे अवघड झालेले असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते अधिक चीड-चिडे, हळवे, आक्रमक, निराश, हतबल होतात. या नकारात्मक भावनांच्या ताणांमुळे त्यांच्या मानसिक आजारात आणखी भर पडत जाते. त्यामुळे नाते संबंधांवर परिणाम होऊन आजारी व्यक्ती जास्त एकाकी बनत जाते. मदतीपासून लाबं होत जाते.

भावनिक पुनर्वसन उपचारांची सुरुवात भावनिक आधारपासून होते. तज्ञ व्यक्ती व कुटुंबियांकडून मिळालेल्या भावनिक आधारामुळे ती व्यक्ती काही प्रमाणात स्थीर व शांत व्हायला मदत होते. त्या नंतर रुग्णांना आपल्या नकारात्मक भावनांचे नियमन व समायोजन करायला शिकवले जाते. त्या योगे दैनंदिन जीवनात निर्माण होणा-या भावनिक समस्या ते आत्मविश्वासाने हाताळू लागतात. आपल्या गरजा, मते, योग्य पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवू शकतात. इतरांकडून मदत घेऊ शकतात. मागील उदाहरण घ्यायचे झाले तर भावनिक समायोजन शिकल्या नंतर ती रुग्ण, आपल्या बहिणीने टीव्ही लावल्याच्या कारणाने तिच्यावर न चिडता, शांतपणे आपल्याला होणारा त्रास सांगू शकते. यामुळे बहिणी बरोबरचे तिचे नाते सुरळीत राहील आणि बिघडलेल्या नातेसंबंधांमुळे येऊ शकणारा ताण वाचेल. शिवाय आपली अडचण स्पष्टपणे सांगितल्यामुळे त्या संदर्भात बहिणीकडून मदत, सहकार्य मिळण्याची शक्यता वाढेल.

सामाजिक पुनर्वसन उपचार

उपचारांची या नंतरची पतळी म्हणजे सामाजिक पुनर्वसन. गंभीर मानसिक आजारांमध्ये होणा-या भावनिक, संवेदनात्मक व बोधात्मक समस्यांमुळे आजाराने ग्रस्त व्यक्तींना आपले नातेसंबंध पूर्ववत व सुरळीत ठेवणे अवघड जाऊ लागते .

बऱ्याचदा बोधानात्मक समस्यांमुळे येणाऱ्या ताणावर उपाय म्हणून देखील आजारी व्यक्ती एकांतात राहणे स्वीकारतात. खरेतर यामुळे त्यांना काही प्रकारचा फायदा होतोही पण त्यांच्या या उपाय योजनेमुळे ते समाजापासून, मित्र-मैत्रीणींपासून लांब जायला लागतात. याने त्यांच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. शिवाय आजारामुळे अशा व्यक्तींकडून वैयक्तिक स्वच्छता, नीट-नेटकेपणा याबाबतीतही हेळसांड होऊ शकते. त्यांच्या अशा वागण्यामुळे इतर लोकही त्यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करू लागतात. सामाजीक पुनर्वसन उपचारांच्या मदतीने या प्रकारच्या समस्यांवर उपाय करता येऊ शकतो. या उपचारांच्या मदतीने आजारी व्यक्ती आपले वर्तन, पेहराव, संवाद इ. समाजमान्य पद्धतीने करण्यास शिकते. त्याचा उपयोग त्यांना आपले सामाजिक जीवन अधिक पोषक बनवण्यास होतो.

व्यावसायिक पुनर्वसन उपचार

पुनर्वसन उपचारांतली या नंतरची आणि महत्वाची पातळी म्हणजे व्यावसायिक पुनर्वसन.

मानसिक आजारांशी संबंधित समस्या नीट समजू न शकल्यामुळे  समाज आणि आजारी व्यक्ती स्वतःदेखील स्वतःला निरुपयोगी, इतरांवर भार, महत्व नसलेली, क्षमता नसलेली अशी अर्थशून्य व्यक्ती समजायला लागते. आणि एक दयनीय आयुष्य जगात राहते. यात त्या व्यक्तीचे तर नुकसान होतेच. पण समाज म्हणून आपल्या सर्वांचे देखेल मोठे नुकसान होते. ते कसे तर, रुग्णांच्या  या अवस्थेमुळे रुग्ण  स्वतः व काहीवेळेस त्याची काळजी घेणारा एक कुटुंबीय अशा दोन व्यक्तींच्या कार्यक्षमता वाया जाते. या वाया गेलेल्या कार्यक्षमतेचा भार समाज म्हणून आपण सारेजण सहन करत असतो या संकल्पनेला Global Burdon of Disease  म्हणजेच “आजारांमुळे निर्माण होणारा एकंदर भार” असे म्हणतात. त्यामुळे मानसिक आजारी व्यक्तींचे व्यावसायिक पुनर्वसन हे त्याना एक सन्माननीय आयुष्य मिळवण्यासाठी आवश्यक तर आहेच. तसेच ती समाज म्हणून आपणा सर्वांची देखील गरज आहे.

व्यावसायिक पुनर्वसन  उपचारांमध्ये आजारी व्य्काक्तीला तीन टप्प्यांमध्ये  प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या टप्प्यात आजारी व्यक्ती, पुनर्वसन केंद्रात चालणाऱ्या व्यवसाय उपक्रमात सहभागी होऊन आवश्यक व्यावसायिक कौशल्ये शिकते. याला शेल्टर्ड वर्कशॉप (Sheltered Workshop)  असे म्हणतात. दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम सुरु करते, अर्थातच तज्ञ उपचारकर्त्याच्या मदतीने. याला सपोर्टेड एम्प्लॉयमेंट (Supported  Employment)  असे म्हणतात. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात उपचारार्थी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात करते. या टप्यावर तिला अगदी थोड्या प्रमाणात तज्ञ उपचारकर्त्याच्या मदतीची गरज पडते.

मानसिक आजाराच्या सर्वच प्रकारात या सगळ्या पातळ्यांवरील पुनर्वसन उपचारांची गरज नसू शकते. हि गरज आजारांच्या प्रकारांनुसार, तीव्रतेनुसार व व्यक्तिपरत्वे वेगवेगळी राहू शकते त्यामुळे  प्रत्येक  व्यक्तीच्या  गरजेनुसार त्याच्या पुनर्वसन  उपचारांचे नियोजन करणे  (Tailor-Made)  महत्वाचे असते. परंतु संख्येने कमी असलेल्या अनेक पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचारांचा, ओषधोपचार, व्यायाम, छंद जोपासना असा सर्वसाधारण एकच ढाचा (Program) सर्व रुग्णांसाठी वापरला जातो. त्यामुळे अनके रुग्णांना व्यक्तीशः पुरेसा उपयोग होत नाही याउलट आजारी व्यक्तींच्या नेमक्या गरजा ओळखून आखलेले उपचार खर्या अर्थाने पुनर्वसन होण्यास उपयोगी पडतात.

अपुरे मनुष्यबळ हि पुनर्वसन केंद्रांना भेडसावणारी एक मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून केंद्रांमध्ये Volunteering  (स्वयंसेवा ) ची संकल्पना राबवता येऊ शकते. आपल्या सारख्या असंख्य व्यक्ती ज्यांना काही प्रमाणात वेळ उपलब्ध आहे व समाजासाठी काही तरी करावे अशी इच्छा आहे, ते आपला वेळ, ज्ञान, कौशल्ये अशा अनेक प्रकारांनी या कामात योगदान देऊ शकतील. तुमच्या अशा योगदानाने  अनेकांची आयुष्ये सावरू शकतील. अशा सर्वांगीण पुनर्वसन उपचारांमुळे गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ति देखील एक सार्थ आणि सन्माननीय आयुष्य जगायला सक्षम होते. औषधोपचारांमुळे आजारी व्यक्ती Cure  होते तर त्याबरोबर घेतलेल्या पुनर्वसन उपचारांमुळे ती Recover होते…..

 

 प्राची मास्तोळी (मानसोपचारतज्ञ)

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *