blog-3

नेमेचि येतो मग..

2 years ago / General Wellness Psychology / 0 Comments

आपण सारेच सध्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या मूडमध्ये आहोत. तसे पाहू गेलो तर गेल्या नोव्हेंबरच्या दिवाळीपासूनच उत्साहाचे वारे अवती-भोवती वाहत आहेत. स्वच्छता, सजावटी, मुहूर्तमेढी, खरेद्या, मेळावे, भेटीगाठी, भेटवस्तू, रोषणाई, पूजा-अर्चा आणि मेजवाण्या! हीच सर्वसाधारण या उत्सवी वातावरणाची व्यवच्छेदक लक्षणं असतात. अगदी जगभर कोणत्याही सणवारांच्या स्वरूपांत, कोणत्याही संस्कृतींत, यात कोणताही मोठा फरक आपल्याला आढळत नाही. आणि नीट पाहिले तर लक्षात येते की यांतली कोणतीच बाब अशी नसते की जी सणवाराशिवाय करता येत नाही. खरे तर आपण याच गोष्टी इतर कारणा-निमित्ताने किंवा विनाकारणसुद्धा वर्षभरात अनेकदा करीत असतोच! मग, या सणवारांत असे नेमके काय असते की जे सर्वसाधारण समाजमनाला उत्तेजित आणि उल्हसित करत असते? अगदी नेमाने आणि न चुकता!

    “राजाघरी रोजच दिवाळी” असे आपण भले म्हणत असलो तरी राजालासुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर वेगळे भरते येतेच येते! आणि मग राजा असो की रंक; ठेवणीतले कपडे, ठेवणीतल्या वस्तू, खास पारंपरिक पदार्थ आणि रीती-रिवाज यांना नव्याने उजाळा मिळतोच मिळतो! एरवी आयुष्यातला तोच-तोपणा नकोसे वाटणारे आपण अशा सणवारी मात्र तोच पारंपरिक व्यवहार मोठ्या आवडीने का बरं करतो? दर ख्रिसमसला किंवा ३१ डिसेंबरला तोच तो (😉) पेला किंवा केक असं कोणतं वेगळं आकर्षक रूप धारण करतो?

    हा प्रश्न मानसशास्त्रज्ञांना पडला नसता तरच नवल! संपूर्ण जगभरातल्या मानवजातीला सण आणि उत्सवांचं गारूड संस्कृत्यांच्या आरंभापासूनच आहे. यात नव-नव्या उत्सवांची नियमितपणे भर पडतेच आहे. मात्र, हे सण आणि उत्सव कितीही जुने होवोत; ते माणसांना नवी उमेद आणि नवी आशा न चुकता प्रदान करतात! यापाठीमागचे मानसशास्त्रीय कारण आहे: चक्क ‘तोच-तोपणा’! हा तोच-तोपणा एकप्रकारे माणसांना जीवनातल्या नेहेमीच्या अनिश्चिततेपासून वेगळा आणि दिलासादायक वाटतो. माणसांच्या भयभीत आणि तणावग्रस्त मनांना ठराविक, साचेबंद रीती-रिवाजांमुळे निश्चीततेचा विसावा मिळतो! रोजचा दिवस कसा सामोरा येईल हे सांगता येत नाही; मात्र ठराविक सणाला ठराविक रिवाज करायचे आहेत ही संकल्पना एकप्रकारे जगण्याला निश्चीतता, नियंत्रण आणि स्थीरतेची भावना देते! सचिंत मनाला आधार देते. एरवी एकट्याने केलेली खरेदी आणि सणवारी केली जाणारी सामुदायिक खरेदी यांत वेगळी, आपलेपणाची खुमारी असते. एरवीची पार्टी आणि सणावारी होणारं साग्रसंगीत जेवण यांत वेगळी, प्रेमाची रंगत असते. इतकंच काय, नेहेमीचे काबाडकष्ट आणि सणावारी होणारी आबालवृद्ध स्त्री-पुरुषांची होणारी पळापळ यांत वेगळा, कृतकृत्यतेचा सुवास असतो! भेटवस्तू भले साध्यासुध्या असतील; पण पायमोज्यातून त्या मिळणारच हा विश्वास खूप मौल्यवान असतो!

    हो, या साऱ्याला कधीकधी मानवी जीवनाच्या आणि स्वभावांच्या गुणधर्मांनुसार काहीतरी गालबोट लागतेसुद्धा. पण, तरीही आपले मन पुढच्या वर्षासाठी सण-उत्सवांतल्या तेवढ्याच क्षणांची आठवण जपते - ज्यांनी आपलं तन-मन उजळलं होतं, मोहरलं होतं! याला “पीक-एंड रूल’ म्हणतात. कुणी कशाला काहीही म्हणोत, तुम्हा सर्वांना आगामी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

— डॅा. अनिमिष चव्हाण, एम. डी. (मनोविकारशास्त्र)

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *