
पाहुणे विचार
9 years ago / Psychotherapy Wellness / 0 Comments
एखादी सकाळ अगदी झाकोळून येते. अंगावरचं पांघरूण दूर व्हायच्या आधीच अर्धवट परिचयाचं कुठलंसं दु:ख मनामध्ये तुडूंब भरलेलं असतं. जणू आपल्या हक्काच्याच घरी मुक्कामी यावं असं ते सर्वदूर पसरून रहातं. आदल्या रात्री किंवा आणखी आधी कधीतरी त्यानं आपला पत्ता शोधून ठेवलेला असतो. आणि आपल्या चंबूगबाळ्यासह ते हळूच आपल्या मनाचा ताबा घेतं.आपण अशावेळी विसरता कामा नये की, हा घसटीचा असला तरी आहे पाहुणाच! त्याचा पाहुणचार करा हवा तर; पण घराचा ताबा देण्याची काय आवश्यकता?
उलट, या निमित्ताने आपण आपल्या मनात चोरप्रवेश होण्याच्या वाटांचा शोध घेऊन त्यांचा शक्य तितका बंदोबस्त करायला हवा. अशा वाटा हमखास प्रत्येकाच्या मनाला असतात. आपण, जितके सावध राहू तेवढ्या त्या वाटा बंद रहातात. नाही तर कुठल्याही छोट्या-मोठ्या प्रसंग, आठवण किंवा कल्पना यांच्या सोबत आपल्या मनाचा प्रदीर्घ ताबा घेऊ पाहणारे पाहुणे विचार आगंतुकपणे या चोरवाटांनी मनात प्रवेश करतात.
सावध राहण्याचा उपाय म्हणजे विचारांना आडकाठी नव्हे; तर केवळ आपल्या सर्व विचारांना निरखून पहाणं! आपल्या अशा जागृत नजरेत इतकी ताकद असते की, असे आगंतुक पाहुणे गुपचूप आपला बाडबिस्तारा आवरून चालते होतात!
डाॅ. अनिमिष चव्हाण.
by Admin
0 Comments
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *