
प्रतिमा
9 years ago / Strength Wellness / 0 Comments
स्वत:ची स्वत:शी चालणारी लढाई अनेक पातळ्यांवरची लढाई असते. प्रतिमा आणि प्रत्यक्षातली लढाई ही त्यांपैकीच एक.
आपली काहीबाही प्रतिमा जशी दुसर् यांच्या मनात असते तशीच स्वत:च्या मनातदेखील काहीएक प्रतिमा असते. आणि इतर व्यक्तींइतकेच आपणही चक्क या प्रतिमेला फसतो!
स्वत:चा शोध घेण्याची प्रक्रीया चालू असेल तर आणि तरच कधीतरी आपण या प्रतिमेला अडखळतो. पण हे अडखळणं आपला प्रवास योग्य दिशेनी होण्यासाठी आवश्यक असतं. नाहीतर अगदी सहज, विनासायास आपण आत्मवंचनेच्या रस्त्यानं घरंगळत असतोच!
आपली ही प्रतिमा आपल्या मनात तयार होण्याची प्रक्रीया म्हटलं तर स्वत:च्या आणि म्हटलं तर समाजाच्या हातानं होत असते. स्वत:ला इतरांच्या नजरेत ‘चांगलं’ स्थान असावं या आपल्या अनावश्यक गरजेतून आपण स्वत:ला सतत घडवत रहातो. म्हणजे, खरं तर, बिघडवत रहातो! आपण आपल्या सत्य स्वरूपापासून दूर दूर जात रहातो.
आपल्या स्वत:वर प्रेम करण्याची हिम्मत ही आपल्या प्रतिमेवर प्रेम करण्यापेक्षा वेगळी आहे. ही हिम्मत कमावल्याखेरीज येत नाही. आणि ती कमावल्याशिवाय आपल्याच टरफलाच्या आतली आपली ओळख – आपली जाणीव – आपल्या नजरेच्या आसपासही फिरकत नाही.
आपण आपल्या प्रतिमेचा साचा बनवून स्वत:ला या साच्यात बसवत असताना कधी अडचण येते तर कधी या साच्यात सुखाने प्रवेश झाल्यानंतर आपल्याच धुमार् यांची कोंडमार होते. या सर्वांत वाईट म्हणजे असे आपणच आपल्याला खुडत आणि खुंटत असताना आपल्याला स्वत:च्या दु:खाची ओळखही नसते! मात्र, त्या साच्यात न सामावण्याची वेदना असते.
या आखीव-रेखीव साच्याबाहेर विस्तीर्ण असलेली आपली जाणीव आपल्या नजरेत सामावण्याची ताकद येण्यासाठीच हा जन्म सरु शकेल!
डाॅ. अनिमिष चव्हाण
by Admin
0 Comments
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *