blog-3

सोशल मिडिया

9 years ago / General Stress Management Wellness / 0 Comments

लोक पूर्वीइतके इतरांना पत्रं लिहीत नाहीत, पूर्वी इतके सर्रास एकमेकांना भेटून गप्पा गोष्टी करत नाहीत किंवा भेटले तरी स्वत:तच (मोबाईलवर) व्यग्र असतात. अगदी घरातही जेवत्या ताटांवरसुद्धा प्रत्येकजण आपापल्या गॅजेटमध्येच गुंतलेला दिसतो. मुलांना असं वाटतं की आई-बाबा आपल्यापेक्षा त्यांच्या वाॅट्सअॅपलाच महत्व आणि वेळ देतात. वगैरे सर्व परिस्थिती मला मान्य आहे. मात्र तरीही याचे खापर गॅजेट्स आणि सोशल मिडियावर फोडावे हे मला मान्य नाही. कसे ते सांगतो:
लोक वाढत्या प्रमाणात आत्ममग्न होत आहेत. वाढता व्यक्तीवाद, वाढत्या प्रमाणातील जीवनाचा वेग, स्पर्धा-कुरघोड्या-पैसा-जीवनमान यांचे वाढते महत्व ही आणि अशी त्याची कारणे आहेत. मानवी संस्कृतीच्या या टप्प्यावर आई-वडीलांनासुद्धा आपल्या स्वत:च्या मुलांचे अंतरंग जाणून घ्यायला सवड नाही आहे. त्यांचे मुलांच्या भविष्याकडे लक्ष आहे; वर्तमानाकडे नाही. शेजारी कोण राहतो, त्याला काय हवं-नकोय हे पाहणं फ्लॅट संस्कृतीत अशक्य/धोक्याचं/वेळखाऊ ठरतं आहे.

हे सर्व वाईट आहे पण लक्षात घ्या हे सर्व गेल्या किमान ५० वर्षांपासून घडायला सुरूवात झाली आहे. दिवसेंदिवस त्याची व्यापकता आणि तीव्रता वाढते आहे. आणि या पार्श्वभूमीवर गेल्या दीड दशकात गॅजेट्स वगैरेंचा उगम झाला आहे. सोशल मिडियाचे प्रस्थ तर आणखी अलिकडले आहे. गॅजेट्स आणि सोशल मिडिया (सो.मि.)चा वापर करणारे आपण मुळात या बदलत्या जीवनशैलीचे बळी आहोत. त्यामुळे आपण या साधनांचा वापर त्याच मूल्यव्यवस्थेत राहून करतो आहोत. कल्पना करून पहा की जर आज जादू होऊन ही गॅजेट्स नष्ट झाली तर काय आपण आपोआप शेजारी-पाजारी, आप्त-सखे यांच्याबरोबर आपला वेळ व्यतीत करणार आहोत? नाही. आपण आपली कामे, स्पर्धा, अभ्यास, करमणूक अशा गोष्टींनी लगेचच आपल्याला व्यस्त करून घेणार आहोत. आठवून पहा: टीव्ही, कंप्यूटर यांवरदेखील माणसांना माणसांपासून दूर करण्याचे दोषारोप फार पूर्वीच झालेले आहेत. वास्तव हे आहे की माणूस स्वत:च्या इच्छेनेच ही जीवनशैली जवळ करतो आहे आणि ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ असं म्हणत दोष मात्र बाह्य गोष्टींना देतो आहे. 

याउलट, सोशल मिडिया हा सोशली ओरिएंटेड आहे. आपण खोटे खोटे का होईना सोशल मिडियातून एकमेकांशी हसतो-बोलतो आहोत; स्वत:च्या जाहिरातीसाठी का होईना इतरांच्या ‘वाॅलवर’ डोकावतो आहोत. कधी कधी या माध्यमातून खूप अानंददायी नाती, समाजकार्येसुद्धा साध्य होताहेत. हे स्वत:बाहेर जाणेच आपल्याला भयावह वाटते आहे का? आपल्या स्वत:च्या स्वार्थाचा विचार करण्याचा वेळ आपण इतरांशी संपर्क साधण्यात वाया घालवतो आहोत याचे आपल्याला दु:ख आहे का? हे खरे की अफवा पसरवणे, हिंसा भडकवणे, निंदा नालस्ती करणे, फसवणूक करणे अशा दुष्कृत्यांसाठीसुद्धा सो.मि.चा गैरवापर होतो. पण ते काही सो.मि.चे व्यवच्छेदक लक्षण नव्हे. चांगल्या वृत्तीच्या माणसांनी त्याचा वापर केल्यास तो चांगलाच होईल. हे ही खरे की, माणसे या माध्यमांना चिकटवल्यासारखी खिळून राहतात. हा दोष दूर करण्यासाठी वापरकर्त्यांचे प्रशिक्षण, प्रबोधन मात्र गरजेचे आहे. तसेच यातली नवलाई उतरण्याची वाट पहाणे आवश्यक आहे.

डाॅ. अनिमिष चव्हाण.

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *