blog-3

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे......

2 years ago / General / 0 Comments

     स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे…ज्येष्ठ कवयित्री शांता शेळकेंनी शब्दबद्ध केलेलं हे स्वप्न तसं आपलं प्रत्येकाचंच नाही का? पण, ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ असं म्हणून आपण ते जागेपणी सोडून देतो. मात्र, जर एखाद्या वैज्ञानिकानी या स्वप्नाचा खरोखरच पाठपुरावा केला तर? म्हणजे असं की, जसं रेल्वे-विमान किंवा लालपरीचं तिकीट काढून आपण एखाद्या प्रवासाला निघतो तसं झोपी जाताना ‘स्वप्नातल्या प्रियाच्या गावा’ चं तिकीट काढता आलं तर! हो, या शक्यतेची पहाट खरोखरच अवतरली आहे!

     झोपेमध्ये पडणारी स्वप्नं हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा, कुतुहलाचा आणि कधी-कधी गोंधळात टाकणारा विषय आहे. विशेषत: मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करणार्‍यांच्या दृष्टीने स्वप्नं हा मनाच्या खूप जवळचा विषय आहे! माणसाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ स्वप्नांशी जोडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मानवी मनाच्या अथांग कोठाराची खिडकी, जागेपणी न सुटणाऱ्या कोड्यांची किल्ली किंवा क्रिएटिव्हिटीची खाण म्हणूनही स्वप्नांचा अनेकदा विचार होतो. या दृष्टीने अनेक तज्ञ अनेक प्रकारच्या थियरीज मांडत असतात. यामध्ये एक आधुनिक थिअरी काही न्यूरोलोजिस्टसनी मांडली आहे. त्यांच्या मते माणसांना अबोध वाटणारी, बुचकळ्यात टाकणारी, विचित्र वाटणारी स्वप्नं  ही माणसाच्या मन आणि बुद्धीला एक प्रकारे “ट्रेनिंग’ देत असतात. हे ट्रेनिंग कशाचं? तर, आपल्या आजूबाजूच्या जगात नियमबद्धता असावी, सुनिश्चितता असावी ही माणसाच्या मनाची गरज असते. त्यामुळे, माणूस अत्यंत गुंतागुंतीच्या या जीवनाचा आणि जगाचा आपल्याला झेपेल इतका सरळ अर्थ लावायचा प्रयत्न करीत असतो. मेंदूला उपलब्ध असणार्‍या अतिप्रचंड डेटामधून आपल्या 'सोयीचा', 'उपयुक्त' डेटा निवडून बुद्धीला 'वेड' न लागेल याची नकळत खबरदारी माणूस घेत असतो! किंबहुना, हे जग असे नियमबद्धच आहे अशी तो आपल्या बुद्धीची समजूत करून घेतो! आपल्या मन-बुद्धीने असे करणे हे  नैसर्गिक आणि उपयुक्तच आहे. पण, यामध्ये 'ओव्हर-फिटींग'चा धोका असतो. ओव्हर-फिटींग म्हणजे जगाचा 'कॉंक्रीट', 'साचेबंध' पद्धतीने अर्थ लावणं. हे एक प्रकारे आपल्या बुद्धी आणि मनाचे 'नॅरो माइंडेड' बनणं न्हणायला हवं; जे अर्थातच या विरोधाभासमय (पॅराडॉक्सिकल), धूसर (ॲबस्ट्रॅक्ट) जगात तगण्यासाठी उपयुक्त नाही. म्हणूनच आपल्याला विश्वाकडे नेहेमीपेक्षा 'वेगळ्या' नजरेने पाहण्याचे कौशल्य आवश्यक असतं. आणि अशी विचित्र, विक्षिप्त स्वप्नं माणसांच्या मेंदूला झोपेच्या काळात हे कौशल्य प्राप्त करण्याचं ट्रेनिंग देत असतात.

     असो! पण, मूळ मुद्दा वेगळाच आहे! तो असा की, आपल्याला हवी तशी स्वप्नं हुकुमी पद्धतीनं 'पाडता' येतील का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देऊन काही वैज्ञानिक अशी उपकरणं तयार करण्याच्या मागे लागले आहेत! ही उपकरणं एक प्रकारे माणसांच्या स्वप्नांना बेसावध टप्प्यावर हॅक करतील. आपली झोप विविध आवर्ती टप्प्यांनी पार पडत असते. NREM1, NREM2, NREM3 आणि REM हे ते चार टप्पे पुनःपुन्हा झोपेच्या कालावधीत येत राहतात. (झोपेमध्ये अर्थातच आपल्याला या टप्पे वगैरे भानगडीचा पत्ता नसतो!) सामान्यतः त्यापैकी REM टप्प्यावर  स्वप्ने पडतात. काही जण नैसर्गिकरित्या किंवा सरावाने आपल्या स्वप्नांचा मजकुर काही प्रमाणात नियंत्रित करू शकतात. त्यांना ल्युसिड ड्रिमर्स म्हणतात. यांचा उल्लेख आणि संदर्भ प्राचीन हिंदू साधना, तिबेटियन आणि बौद्ध परंपरांपासून (स्वप्नस्वातंत्र्य, स्वप्नदर्शन, ड्रिम योगा - milam) ते आधुनिक पॅाप्युलर कल्चर (Inception, Lucid Dream नामक मुव्हीज्) पर्यंत आलेला आढळतो.  सरासरी ५० टक्के व्यक्तींना अशा ल्युसिड स्वप्नांचा कधी ना कधी अनुभव येतो - ज्यामध्ये त्यांना झोपेत असूनही आपण स्वप्न पहात असल्याची स्पष्ट जाणीव असते. शिवाय स्वप्नांतली पात्रं, वातावरण, संवाद इत्यादींचं स्क्रिप्ट ते इच्छेनुसार बदलू शकतात! पण, मुळात स्वप्न काय पडावे यावर त्यांचे नियंत्रण नसते.  म्हणजे, स्वप्नाचा महाल सजवता येईल पण महाल निवडता येणार नाही! या नव्या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मात्र ‘माझ्या मनातला का तेथे असेल रावा’ या प्रश्नाचे उत्तर देता येणार आहे! या तंत्रज्ञानावर आधारीत उपकरणं  आपल्या झोपेतील हिप्नागोगिक (Hypnagogic: NREM1) टप्प्यावर काही आवाज, वास किंवा दृश्यांचा मेंदूला पुरवठा करून 'ऑर्डर' नुसार स्वप्नं पाडण्यासाठीचा कच्चा माल पुरवतील. आणि मग आपण फक्त 'स्वप्नातील सुखाचा स्वप्नीच वेध घ्याया' सुखाने झोपून जायचे! आहे ना खाशी गम्मत!

  • डॉ. अनिमिष चव्हाण, एम. डी. (मनोविकारतज्ञ)

    

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *