
सोयीची वेळ अन् वेळेची सोय
9 years ago / Strength Wellness / 0 Comments
रात्र थोडी, सोंगे फार! मनाला दडपणाच्या खाईत लोटणारी ही नेहेमीची परिस्थिती. आणि या दडपणानं मन दबून गेलं की ही ‘रात्र’ अजूनच निष्फळपणे हातातून सरायला लागते. ‘सोंगां’चं भय तेवढं वाढत रहातं.वेळ पुरेसा नसल्याची भावना हा यातला कळीचा मुद्दा. ही भावना खरी आणि आवश्यक आहे का?
वरवर पाहता ही भावना अगदी रास्तच आहे असं आपलं मन सांगतं. इतके इतके दिवस किंवा तास आपल्यापाशी आहेत आणि तेवढ्या वेळात न उरकण्याएवढा कामांचा ढीग समोर दिसतो आहे, असं ते सरळ गणित असतं.
पण, आता आपण थोडं खोलात जाऊन या प्रश्नाकडे पाहू.
त्याकरीता ‘वेळ’ ही संकल्पना आधी तपासून घेऊ. अमूक एका गोष्टीनंतर अमूक एक गोष्ट घडते या गृहीतकावर आधारलेली वेळ ही एक आपल्या मनात साकारणारी संकल्पना आहे. या संकल्पनेला आपण घड्याळाच्या मदतीने वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतो. पण, असे करता करता घड्याळ हेच वास्तव आहे असे अत्यंत ठामपणे, नि:शंकपणे गृहीत धरून टाकतो. प्रत्यक्षात मात्र, वेळ ही समजूत आहे केवळ.
समजा, आपल्याला घड्याळात पाच वाजेपर्यंत काही एक काम पूर्ण करायचं आहे. आणि आत्ता घड्याळात दहा वाजले आहेत. तर येत्या सात तासांच्या अवधीत एकापाठोपाठ एक अशा कोणकोणत्या घटना घडणार आहेत हे आपण ठामपणे सांगू शकतो का? मुळीच नाही. पण, काही ना काही घडत राहील हे आणि इतकेच मात्र निश्चीत! मग आपण ही निश्चीतता वाढविण्यासाठी – अर्थात तशी आपल्या मनाची समजूत वाढविण्यासाठी – घड्याळाला सेकंदाचे आणि मिनीटाचे काटे देतो. म्हणजेच, दहा नंतर अकरा, बारा आणि कधीतरी पाच वाजतील अशी निश्चीत घटनांची चक्क कृत्रिम सोय करतो!
जर, जगातली यच्चयावत घड्याळं बंद पडली किंवा आपण नाकारली तर काय राहील? तर, इतकंच राहील की, काही ना काही घडत राहील… आपण काही धडपड केल्यानं त्या ‘काही ना काही’मध्ये काही तरी बदल होईल. तो बदल व्हावा अशी आपली इच्छा आहे म्हणून आपण काही धडपड जरूर करू या. पण, तिथे वेळेचा काय संबंध?
वेळेची संकल्पना ही सोय जरूर आहे; पण कृत्रिमच आहे हे लक्षात ठेवले तर या सोयीची गैरसोय होणार नाही!
डाॅ. अनिमिष चव्हाण
by Admin
0 Comments
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *