blog-3

‘उपचार’

7 years ago / Stigma Discrimination / 0 Comments

“अरे आपल्या गावातली सगळी येडी गोळा केलीत एस्टी स्टॅंडवर! चहा बिहा पाजतायत त्यांना आणि गाडीत घालून नेणारेत कुठंतरी!” काॅलेजवयीन एक मुलगा उत्तेजितहोऊन बातमी सांगत होता आपल्या मित्रांना. आणि माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं एक विचित्र दृश्य. सजवलेल्या प्राण्यांचं.

नाही, त्यांना काही कोणी कत्तलखान्यात नाही घेऊन चाललेलं. उलट रस्त्यांवर उपासपोटी ऊन-पावसात, घाणीत वाहून चाललेलं त्यांचं आयुष्य कुणीतरी कणवेच्या ओंजळीतउचलून आरोग्याच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतंय. मेंटल हाॅस्पिटलमध्ये त्यांना सुरक्षित वातावरण, पुरेसं अन्न आणि योग्य औषधोपचार मिळतील या ‘आशेनं’.

पण, मला नजरेसमोर दिसतात  मेंटल हॉस्पिटलमधले चेहेराहीन हजारो रुग्ण आणि त्यांच्यासाठी राबणारी तुटपुंजी, हतबल यंत्रणा. ही यंत्रणा स्वत:च आजारी पडू नये म्हणूनरुग्णांची आवक कमी करून जावक वाढावी यासाठी जंग जंग पछाडते आहे. नियमावली करते आहे. आणि आम्ही मात्र अशा मनोरुग्णांना आमची घरं, आमच्या वस्त्या,इतकंच काय आमच्या ओळखीपासून शक्य तितकं दूर, ‘सुरक्षित’ ठेवण्यासाठी असे लोंढे रस्त्यांवर, देवांच्या दारी नाहीतर मेंटल हाॅस्पिटलमध्ये जमा करतो आहोत.

मला आठवतात  मनोरुग्णांना बरं करून त्यांना त्यांच्या घरी, सग्या-सोयर् यांकडे पोहोचविणार् या कार्यकर्त्यांचे विदारक अनुभव. ‘याला किंवा हिला आमच्याकडे का परतआणलंत?’ असं म्हणून नातेवाईकांनी केलेले हल्ले!

मला दररोज दिसतात इभ्रतीच्या नालायक कल्पनांपोटी घरा-घरांमधून दाबले जाणारे मानसिक वेदनांचे हुंकार. मला ऐकू येतात मनोरुग्ण व्यक्तींनी माणूस म्हणूनसन्मानासाठी फोडलेले मूक टाहो. मला समजतो ‘आजारी असलो तरी सक्षम आहोत’ हे सिद्ध करण्यासाठी हव्या असलेल्या एका संधीसाठी केलेला अदृष्य आक्रोश! मलाआठवते उपचारांवर ‘अनुत्पादक’ खर्च करण्यापेक्षा मोफत उपदेश करण्याची शहाण्या माणसांनी दाखवलेली हुशारी!

आणि मी भानावर येतो पुन्हा त्या मुलाच्या मित्रांनी एकमेकांना दिलेल्या टाळ्यांनी. व्हाट्सअॅपवर टाकण्यासाठी केलेल्या फोटोंच्या लखलखाटांनी.

डाॅ. अनिमिष चव्हाण.

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *